भाईंदर: २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
गणपती उत्सवाच्या जादा वाहतूकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत श्री. सरनाईक बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. यंदा सुमारे ५००० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. या बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण २२ जुलैपासून सुरू होत आहे.
२३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.