अर्ध्या तासाचा प्रवास गेला तीन तासांवर
सुरेश सोंडकर/ठाणे
दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे ठाणे-नाशिक महामार्ग नेहमीच चर्चा विषय ठरला आहे. येथील वाहतूक कोंडीमुळे अर्ध्या तासाचा प्रवास तब्बल तीन तासांवर गेला असून मानसिक आणि शारीरिक त्रासही वाहनचालकांना भेडसावत असतो. विशेष म्हणजे या कोंडीत अडकलेल्या हजारो वाहनांच्या माध्यमातून वर्षभरात ५२०० कोटी ते ६६०० कोटी रुपयांचे इंधन नाहक जळून जाते, असा निष्कर्ष एका अभियांत्रिकी प्रशिक्षकाने काढला आहे.
बांधकामातील अभियांत्रिकी त्रुटींमुळे ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा प्रवाह रोखला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. २३.८ किमी लांबीचा वडपे-माजिवडे विस्तार प्रकल्प आठ मार्गिकांच्या महामार्गात रूपांतरित केला जात आहे. यात ७६ टक्के काम पूर्ण झाले असले तरी परिणाम शून्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण लांबीवर एकच मार्गिका बांधून पूर्ण केल्यास त्या टप्प्यातच फायदा मिळेल, यातून बांधकाम सुरू असतानाही वाहतूक सुरू राहील आणि वाहनांची गर्दीही होणार नाही, असे मत अभियांत्रिकी प्रशिक्षक राजेंद्र उत्तुरकर यांनी मांडले आहे. महामार्गावर मार्गिकांची संख्या सतत बदलते, त्यामुळे अरुंद मार्गिकेवर वाहतूक मंदावते. त्यामुळे एकसमान दोन मार्गिका संपूर्ण लांबीवर असाव्यात. बांधकामांमुळे अनेक ठिकाणी वाहनांना कमी वेगावर आणावे लागते. ही वळणे २०-३० अंशाच्या मर्यादेत पुन्हा डिझाईन करायला हवीत. विशेष म्हणजे पुरेसे दिशादर्शक फलक नसून लेन मार्किंगही अस्पष्ट आहेत. त्यामुळे वाहने अचानक मार्गिका बदलतात आणि अपघात होत असल्याचे श्री.उत्तुरकर यांचे म्हणणे आहे.
या महामार्गावर रोज ५० हजार वाहने सुमारे दोन तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या अवस्थेत राहतात. त्यामुळे दररोज ६० हजार ते ८० हजार लिटर इंधन वाया जाते, म्हणजे दररोज ६० ते ८० लाखांचा अपव्यय होतो. त्याचवेळी ५० हजार लोक दररोज दोन तास गमावतात. म्हणजे दिवसाला एक लाख मानवी तास गमावतात. ३०० रुपये प्रति तास धरल्यास वार्षिक १०९५ कोटी उत्पादक वेळ वाया जातो. याशिवाय तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहिल्याने श्वसन, हृदयविकार, पाठीचे त्रास आणि मानसिक ताण वाढतात. तर एखादी रुग्णवाहिका कोंडीत अडकल्या जीव वाचवण्याची संधी कमी होते. त्यामुळे ही केवळ वाहतूक समस्या नसून हा मोठा राष्ट्रीय तोटा असल्याचे मत श्री.उत्तुरकर यांनी व्यक्त केले आहे.
ठाणे-नाशिक महामार्ग भिवंडी या आशियातील सर्वात मोठ्या गोदाम केंद्राला मुंबईच्या न्हावा-शेवा बंदराशी जोडतो. दिग्गज कंपन्यांची येथे प्रचंड लॉजिस्टिक सुविधा आहे. त्यामुळे हा महामार्ग अडल्यावर त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक रक्ताभिसरणावर होतो, असे मतही श्री.उत्तुरकर यांनी मांडले आहे.
महामार्गावरील कोंडीतून देशाचे वार्षिक नुकसान
* थांबलेल्या वाहनातील इंधनाचा अपव्यय २२०० ते २९०० कोटी
* वाहनांची जादा देखभाल: ५०० ते ८०० कोटी
* उत्पादक वेळेचे नुकसान: १०९५ कोटी
* पुरवठा साखळी विस्कळीत: १२०० ते १५०० कोटी
* आरोग्यविषयक खर्च: २०० ते ३०० कोटी