सिव्हिल रुग्णालयात ५० टक्के रुग्ण मानदुखी-कंबरदुखीचे

लॅपटॉप मोबाईलच्या व्यसनामुळे वाढतेय त्रासाचे प्रमाण

ठाणे: जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागात येणाऱ्या तब्बल ५० टक्के रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचे निदर्शनास आले आहे.

चुकीची आसनशैली, सतत बसून काम करण्याची पद्धत, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावर ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत जातो.

तासनतास संगणक वा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत राहिल्याने मान आणि पाठीच्या स्नायूंवर ताण येतो. परिणामी मानेत वेदना, चक्कर येणे, हातात मुंग्या येणे, अशक्तपणा, तर काही प्रकरणात पकड कमी होण्याची लक्षणे दिसतात. कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये कंबरेतील वेदना, पायात जळजळ, बधिरता आणि पायातील अशक्तपणा अशा आढळतात

या तक्रारींवर रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. विभागात दररोज साधारण ५० रुग्ण उपचारासाठी येत असून, यापैकी अर्ध्याहून अधिक मान आणि कंबरदुखीचे असतात. तीव्र वेदनेच्या अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम-थंड शेक, चुंबकीय, विद्युत, ध्वनीलहरी, लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार दिले जातात. त्यामुळे वेदना कमी होतात आणि हालचाल सुधारते. त्यानंतर कण्याला आधार देणाऱ्या कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपींचा वापर केला जातो. हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत होत नाहीत आणि शस्त्रक्रियेची वेळही टाळता येते.

आरोग्यदायी मणक्यासाठी संतुलित आहार, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि डी युक्त अन्न, दररोजचा हलका व्यायाम, थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे, योग्य खुर्चीचा वापर, स्क्रीन नजरेच्या समांतर ठेवणे आणि वजन उचलताना गुडघे वाकवणे हे सोपे पण प्रभावी नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.
,
“शरीराची योग्य काळजी घेणे हेच खरे औषध आहे.” मोबाईल आणि लॅपटॉपच्या युगात शरीराचा ‘नेटवर्क’ही कायम जोडलेला राहावा, यासाठी आता प्रत्येकाने थोडं थांबून स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं झाले आहे, असे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.