* नगरपरिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
* नाले, अंडरग्राउंड ड्रेनेज, पाणीपुरवठा, रुग्णालय, नाट्यगृहासाठी भरीव निधी
बदलापूर: कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचा कोणताही करवाढ नसलेला आणि नागरिकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सोमवारी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी सादर केला. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना घरपट्टीमध्ये तब्बल ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आला. राज्य शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर ही सवलत लागू होणार असून त्यामुळे शहरातील करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी मागील वर्षाचा आर्थिक आढावा तसेच येणाऱ्या वर्षाचा अंदाजित लेखाजोखा सभागृहासमोर मांडला. या बैठकीला उपनगराध्यक्षा प्रियंका दामले या देखील उपस्थित होत्या.
शहराच्या दीर्घकालीन विकासाला चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नव्या नाल्यांची उभारणी, अंडरग्राउंड ड्रेनेज योजना, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी रुग्णालय उभारणी तसेच सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी नाट्यगृह उभारणीसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांतून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करून मोठ्या विकासकामांना गती देण्याचा नगरपरिषदेचा मानस असून, आवश्यक निधी उभारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कर्जरोखे उभारण्याची तयारीही नगरपरिषदेने दर्शविली आहे.
८ मार्च २०२६ नंतर बदलापूर शहरात जन्मलेल्या प्रत्येक कन्येच्या स्वागतासाठी तिच्या नावाने पाच हजार रुपयांची बचत रक्कम नगरपरिषदेच्या वतीने जमा केली जाणार आहे. ही रक्कम संबंधित मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर व्याजासह तिला मिळणार असून तिच्या शिक्षणासाठी ती उपयोगी पडावी हा या योजनेमागील उद्देश आहे. या उपक्रमासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील सुमारे ५०० नोंदणीकृत दिव्यांग नागरिकांना सध्या दिली जाणारी १००० रुपयांची मासिक पेन्शन वाढवून १ एप्रिल २०२६ पासून २००० रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांगांच्या आरोग्य उपचारांसाठी प्रत्येकाला २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आला असून सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पात अग्निशमन दलासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. श्वान निर्बिजीकरण, निवाऱ्यासाठी ३.२५ कोटी, नाट्यगृहासाठी पाच कोटी, एरंजाड सांस्कृतिक केंद्रासाठी पाच कोटी, क्रीडा संकुल कात्रप पाच कोटी आणि हेंद्रेपाडा पाच कोटी, कला-क्रीडा महोत्सवासाठी (नगराध्यक्षा चषक) २५ लाख, छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी पाच कोटी, स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा उभारण्यासाठी एक कोटी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व सोनिवली स्मारक सुशोभीकरणासाठी एक कोटी आणि उल्हास नदी परिसर शिवसृष्टी पथ यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.