मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
ठाणे : काही लोक ५० खोक्यांचा आरोप करत असले तरी, आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० कोटींपेक्षा अधिक मदत करून चोख उत्तर दिल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.
ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कोर्ट नाका आणि रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर आनंद आश्रम येथे शेतकरी लॉंग मार्च दरम्यान निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुबियांना पाच लाखांची आर्थिक मदत केली.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला. दरम्यान शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असून मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत होऊ घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्मारक हे जागतिक दर्जाचे असेल, जगाला हेवा वाटेल असे ते असणार असून परदेशातील लोक हे स्मारक बघायला येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान महाराष्ट्र राज्य किंवा देश सहन करणार नाही, सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध यात्रा आणि सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी सावरकर गौरव यात्रा काढलेली आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, त्यांना त्यांची जागा जनता दाखवून देईल असेही त्यांनी सांगितले.