४२ सुरक्षारक्षक झाले लिपिक

ठाणे: ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ४२ सुरक्षा रक्षकांना पदोन्नती देऊन त्यांना थेट लिपिक पदाची बढती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सुरक्षा रक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार मागिल आठवड्यात ६२ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची विविध विभागांत बदली करण्यात आली असून सफाई कामगार तसेच शिफाई यांचा या पदोन्नतीमध्ये समावेश आहे.

महापालिकेत सुमारे ३२५ लिपिक पदाच्या जागा रिक्त झाल्या होत्या, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना दोन ते तीन विभागाचा पदभार सांभाळून काम करावे लागत होते. अनेक विभागांत सफाई कर्मचारी, शिपाई हे लिपिक पदाचे काम करत होते. या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी महापालिकेतील वाहनचालक आणि सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांना देखिल लिपिक पदाची पदोन्नती देण्यात आली होती. त्याचबरोबर वारस हक्काने नोकरीला लागणाऱ्या पदवीधर उमेदवारांना महापालिकेने लिपिक पदावर नियुक्ती केली होती.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्यालयाचे उपायुक्त जी.जी.गोदेपुरे, कार्मिक अधिकारी श्री. गुंडप्पा यांनी या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी मेहनत घेतल्याचे पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.