३९ हजार महिलांनी केला अर्ध्या तिकीटात प्रवास

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या बसमध्ये तिकिट प्रवासात महिलांना ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्याचा लाभ ३९ हजार महिलांनी पहिल्याच दिवशी घेतला. तर ६० वर्षांवरील ६९४४ ज्येष्ठ नागरिकांनीही मोफत प्रवासाचा लाभ घेतला.

काल बुधवारी १२ वाजल्यापासून गुरुवारी रात्री ८.५० वाजेपर्यंत ३९ हजार २८ महिला प्रवाशांनी प्रवास केला आहे आणि ६९४४ ज्येष्ठ नागरिकांनीही या सुविधेचा लाभ घेतला. या सवलतींमुळे ‘टीएमटी’ सेवेला २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचा-यांचे वेतन, त्यांची देणी देण्याचे आव्हान परिवहन सेवेपुढे उभे राहण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना तिकीटात ५० टक्के सूट जाहीर केली आहे. ठाणे परिवहन सेवेला ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणार आहे. यापूर्वी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातीत ज्येष्ठ नागरिकांना टीएमटीच्या बसेसमधून विनामुल्य प्रवासासाठी प्रशासनातर्फे ओळखपत्र देण्यात येत होते. आता ६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना याचा फायदा होणार आहे.