ठाणे: गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक करून ३७ लाखाचा गांजा जप्त केल्याची माहिती आज पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडीचे गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की भिवंडी येथे फैजल अन्सारी हा अब्दुल रहमान अन्सारी याला गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगाने जनार्दन सोनावणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून फैसल अकबर अन्सारी (४४) अब्दुल रहमान मुजाहीद अन्सारी (२०), अन्वर जमीलूद्दीन अन्सारी यांना अटक केली. यातील पहिल्या दोघांच्या आणि तिसऱ्या इसमाच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये 74 किलो 548 ग्रॅम वजनाचा 37 लाख 37 हजार 400 रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला.
याबाबत भोईवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी करीत आहेत.