स्वतंत्र एक्सप्रेस फिडर जलवाहिनी उभारण्याचा प्रस्ताव
भिवंडी : भिवंडी ग्रामीण परिसरातील ३१ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महत्वपूर्ण शहाड ते टेमघर अशुद्ध जलवाहिनी, टेमघर ते माणकोली शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी आणि एक्सप्रेस फिडरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनुसार राज्य सरकारकडून मोठा निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय काल सोमवारी घेण्यात आला.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेने भिवंडी ग्रामीणच्या पाणीपुरवठ्याबाबत विविध निर्णय घेतले. `स्टेम’मार्फत भिवंडी ग्रामीणमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठा आणि पाणीटंचाईसंदर्भात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मागणीवरून विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी रोहन घुगे यांच्याबरोबरच `स्टेम’चे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांचीही उपस्थिती होती. भिवंडी ग्रामीणमधील गावांना सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी राज्य सरकार कायम सकारात्मक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीत स्टेम प्राधिकरणाकडून २४ गावांसाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर पाइपलाइन उभारण्याच्या अंदाजे ९४ कोटींच्या योजनेबाबत चर्चा झाली. भिवंडी ग्रामीण परिसराला वाढीव पाणीकोटा मंजूर झाल्यानंतर एक्सप्रेस फिडर पाईपलाईन महत्वाची ठरणार आहे. पाणीपुरवठा वाहिन्यांबरोबर एक्सप्रेस फिडर योजनेला ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविले जाईल. त्यामुळे खारबाव, काटई, खोणी, कांबे, कशेळी आदी गावांसह २४ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.
स्टेम प्राधिकरणाकडून ठोक मीटर नसतानाही सुमारे ७ कोटी रुपयांची जास्तीची रक्कम आकारण्यात आली होती. त्यासंदर्भात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी काटई, खोणी, कांबे, कोन, गोवे आदी गावांना भेटी देऊन सुनावणी घेतली. त्यानुसार थकीत रकमेवरील विलंब आकारासह ९ कोटी २५ लाखांसह एकूण १५ कोटी रुपयांची ग्रामपंचायतींना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामीण भागासाठी ७ टक्क्याने होणारी पाणी दरवाढ टाळण्याचा निर्णय घेतला गेला. या सकारात्मक पावलांमुळे काही ग्रामपंचायतींनी थकीत रकमेच्या भरण्याला सुरुवात केली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
`मुंबई आयआयटी’च्या सहकार्याने शाफ्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून भिवंडी तालुक्यात सर्व भागात पुरेसे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचा भिवंडी शहराबरोबरच ग्रामीण भागाला फायदा होईल. कोनगाव, सरावली, गोवे, पिंपळघर ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र जलवाहिनी उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीत अनधिकृत नळजोडण्या बंद करण्याचे आदेशही दिले गेले असून, या सर्व निर्णयांमुळे पाणी व्यवस्थापनात सुधारणा घडून येणार आहे.