एनएमएमटी बसमधील २१४२ फुकट्या प्रवाशांना चार लाखांचा दंड
नवी मुंबई : जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत एनएमएमटीच्या बसमधून विनातिकीट प्रवास करणारे २१४२ फुकटे प्रवासी परिवहनच्या जाळ्यात सापडले. त्यांच्याकडून परिवहनने तब्बल तीन लाख ९१,३८३ इतका दंड वसूल केला आहे.
नवी मुंबईत सध्या वातानुकुलीत बसेस सर्वच मार्गावर धावत असल्याने शक्यतो या बसमधून प्रवास करणारे प्रवासी हे तिकीट काढूनच प्रवास करतात. कारण या बसमधून फुकट प्रवास करताना तिकीट तपासणीसाकडून पकडले गेल्यास नाहक ३०० रुपये दंड भरावा लागतो.
नवी मुंबईसोबत ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल या भागांत एनएमएमटीची सेवा चालते. या दूरच्या मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. त्यातही कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणात प्रवासी बसमधून प्रवास करत असतात. अशा गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी आपला थांबा आला की तिकीट न काढता उतरून जातात. त्यामुळे प्रशासनाचे आर्थिक नुकसान होते.
प्रशासनाच्या हे निदर्शनास आल्यानंतर या फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी एनएमएमटी प्रशासनाने ३५ तिकीट तपासनीसांची नेमणूक केली. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन तिकीट तपासणीस हजर राहून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करतात. सध्या रात्रीच्या वेळी देखील तिकीट तपासणीस गर्दीच्या बस थांब्यावर हजर राहतात. पूर्वी दोन तिकीट तपासणीस हजर राहायचे, आता त्यांची संख्या वाढल्याने पाच ते सहा तिकीट तपासणीस हजर राहतात. त्यामुळे तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.
२०२१ मध्ये वर्षभरात ३२ लाख २१,२७१ इतक्या प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली असून त्यातून ४२३७ विनातिकीट प्रवासी पकडले गेले. त्यांच्याकडून तब्बल पाच लाख ७२,६६३ इतका दंड वसूल करण्यात आला. २०२२मध्ये १०,७३८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून पाच लाख ९८,१७५ इतका दंड ल, २०२३ मध्ये ३,५७८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून सहा लाख ३१,११४ रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती परिवहन उपक्रमाकडून देण्यात आली.