३० तास वाहतूक कोंडी! २५ किमी वाहनांच्या रांगा!

* मुंबई-पुणे महामार्गावर गॅस टँकरचा अपघात
* कोंडीत नागरिकांची उपासमार
* गॅस गळती रोखण्यात अखेर यश

ठाणे: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात बोगद्यानजीक मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्रोपोलिन गॅस असलेला टँकर पलटी होऊन गॅसगळती सुरू झाली. त्यामुळे वाहतूक रोखण्यात आली. परिणामी घटनास्थळापासून सुमारे ३० किमी लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. ही वाहतूक कोंडी बुधवारी रात्री ११ पर्यंत होती. या कोंडीत हजारो नागरिक अडकल्याने त्यांची उपासमार झाली. सायंकाळी गॅस गळती रोखण्यात यश येऊन अंशतः वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत नागरिकांचे अतोनात हाल झाले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात बोगद्यानजीक मंगळवारी सायंकाळी ५ वाजता गॅस टँकरचा अपघात झाला. गॅस टँकर उलटला आणि ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची मोठी गळती झाली. त्यानंतर तातडीने महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने वळवण्यात आली. द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात जुन्या महामार्गाने वळविल्याने खोपोलीपासून पुढे २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. परिणामी, वाहनचालक-प्रवासी, रुग्ण, विमानतळावर पोहचण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची उपासमार होऊन प्रचंड हाल झाले.

गॅस गळती झाल्याबरोबर एमएसआरडीसीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाला पाचरण केले. मात्र गॅस गळती रोखणे त्यांना शक्य झाले नाही. अत्यंत अवघड, आव्हानात्मक काम असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज भासली. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि रिलायन्स कंपनीतील संबंधित तज्ज्ञांना बुधवारी सकाळी बोलवले. तज्ज्ञांचे पथक आल्यानंतर त्यांनी गॅस गळती रोखण्याच्या कामाला सुरुवात केली.

दुपारी ३ वाजता गॅस गळती रोखण्यात तज्ज्ञांच्या पथकाला यश आले. गॅस गळती रोखल्यानंतर गॅस टँकर हटविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी आवश्यक यंत्रसामग्री मागवण्यात आली होती. तरीही रात्री उशिरापर्यंत या महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश संबंधित विभागाला दिले. या वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारशींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.

१६३ एसटी बस अडकल्या

परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 73 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. या कोंडीत महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने अडकली होती. यात पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील सात वाहनांचा समावेश होता.