अपघातग्रस्त क्रीडा विश्लेषकास मिळाली 30.96 लाखांची भरपाई

ठाणे येथील ‘मोटार अपघात न्यायाधिकरण’ने क्रीडा विश्लेषकाच्या बाजूने निकाल देत ३० लाख ९६ हजार रुपयांची भरपाई दिली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये पुणे सोलापूर रस्त्यावरील दौंड येथे झालेल्या रस्ते अपघातात जखमी झालेल्या २४ वर्षीय क्रीडा विश्लेषकाला भरपाई दिल्यामुळे त्याला त्याच्या भावी आयुष्यात ही रक्कम कामी येणार आहे.

‘एम.ए.सी.टी’चे सदस्य एम.एम.वलीमोहम्मद यांनी आपल्या आदेशात, लक्झरी बसचा मालक दीपक जरंडे आणि दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड यांना संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे दावेदाराला सात टक्के व्याजासह भरपाई देण्याचे आदेश दिले. विमा कंपनी आणि बस मालकाने दावे दाखल करण्याची तारीख वेळीच देण्यास अयशस्वी झाल्यास रक्कम वसूल होईपर्यंत आठ टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

दावेदारातर्फे वकील अ‍ॅड. सचिन माने यांनी न्यायाधिकरणाला माहिती दिली की, दावाकर्ता ओंकार सुभाष शेंडे हा अविवाहित असून सोलापुरातील मोहोळ येथील रहिवासी आहे. तो हुडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये क्रीडा विश्लेषक म्हणून काम करत असून त्याला दरमहा २०,२०० रुपये पगार मिळतो.

२८ ऑक्टोबर २०१९ रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास तो पुणे – सोलापूर रस्त्यावर एका लक्झरी बसमधून प्रवास करत असताना बस दौंडला पोहोचली. चालकाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे बस चालवून दुस-या बसला धडक दिली. या अपघातात दावेदार गंभार जखमी झाला होता. त्याच्यावर दौंड आणि पुणे येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच त्यांना यापूर्वीच उपचारांसाठी तीन लाख रुपये खर्च करावे लागले आहेत आणि अजूनही उपचार सुरू आहेत, ही बाब त्यांनी न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणली.

अ‍ॅड. सचिन माने यांनीही न्यायाधिकरणाला सांगितले की, दावेदाराच्या उजव्या डाव्या गुडघ्याखाली विच्छेदन आणि डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे ६०टक्के अपंगत्व आले. बसचा मालक हजर न झाल्याने त्याच्याविरुद्ध एकतर्फी खटला चालवण्यात आला.

अ‍ॅड. ए.के. तिवारी विमा कंपनीसाठी हजर झाले आणि त्यांनी दावा लढवला.

न्यायाधिकरणाच्या आदेशात ‘एमएसीटी’ च्या सदस्याने विमा कंपनीला नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत आणि ती रक्कम बसच्या मालकाकडून वसूल करण्याचीही मुभा दिली. त्यामुळे एकूण नुकसान भरपाईची रक्कम रु. ३० लाख ९६,६३४ रुपये, वैद्यकीय बिलासाठी तीन लाख ६९,१३४ रुपये, ४० हजार रुपये वेदनांसाठी, २० हजार रुपये विशेष आहार आणि वाहतूक व इतर सेवांसाठी एक लाख २५ हजार रुपये दावाकर्ता ओंकार शेंडे यांना देण्यात आले.