ठाणे: ठाणे महापालिकेच्या उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तब्बल २६५ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये स्थायी समितीचे अधिकार असलेले १७० विषय ३५अ कायद्याने मंजुरी करिता ठेवण्यात आले असून ७२ब नुसार प्रशासनाने मंजुरी दिलेल्या प्रकरणावरून महासभेत गरमागरम चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
बुधवारी होणाऱ्या महासभेत रुग्णवाहिका सुविधा, भटके श्वान निवारा, पादचारी पूल, माहिती तंत्रज्ञान सेवा व्यवस्थापन आदी विविध विकासकामांचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत. मूळतः ९० प्रस्ताव सभेसाठी निश्चित होते; मात्र स्थायी समिती स्थापन न झाल्यामुळे तिच्या अखत्यारितील १७० प्रस्तावही आता महासभेसमोर ठेवण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेमुळे प्रलंबित राहिलेले हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होते.
दरम्यान, नगरसेवकांकडून विविध कामांसाठी १६ सूचना प्रस्तावही सादर करण्यात आले आहेत. यामध्ये दिवा परिसरातील अनधिकृत शाळांवर कारवाई, परिवहन आगाराचे आरक्षण विकसित करणे, अभय योजना लागू करणे, नवीन रुग्णालय उभारणी, दिवा रेल्वे स्थानकाजवळील तलाव सुशोभीकरण, जलवाहिन्या टाकणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण खारीगाव-पारसिकनगर येथे बाजारपेठ आणि वाहनतळ उभारणी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.