नवी मुंबई : न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना जलवाहिनी देखभाल व दुरुस्ती नवीन पनवेल येथील कंत्राटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवार ८ जुलैपासून कामगार हितकारणी सभेच्या नेतृत्वाखाली सीबीडी कोकण भवन येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्यांची पूर्तता न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशाराही या कामगारांनी दिला आहे.
दरम्यान राज्य शासनाचे कामगार मंत्रालय व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग संचलित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन हे आमच्या मागण्यांवर गंभीर नसून आमचा दहा वर्षांची प्रलंबित भविष्य निर्वाह निधी, चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून कायम करणे यासारख्या मागण्यांवर निव्वळ आश्वासने देऊन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता आमच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक उरलेला नाही म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसलो असून मागण्या मान्य न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याचे उपोषणकर्ते कामगारांनी सांगितले आहे.