आणखी एका रोमांचक नवीन वर्षाची सुरुवात करण्या पूर्वी, भूतकाळावर चिंतन करण्याची आणि त्याच्या असंख्य वैभवांचा आनंद घेण्याची वेळ आली आहे. भारतीय महिला क्रिकेट मध्ये आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२३ मध्ये घडवून आणलेले पराक्रम यांवर विशेष लक्ष केंद्रित करून, त्यांनी अनुभवलेले अव्वल पाच क्षण ठाणेवैभव ने निवडले आहेत:
भारताने पहिल्यांदाच झालेला आयसी वूमनस अंडर १९ टी-२० विश्वचषक जिंकला
भारतीय महिला क्रिकेटने २०२३ ची सुरुवात एकदम धमाकेदार केली. भारतीय महिला अंडर १९ संघाने दक्षिण आफ्रिकेत झालेला आयसीसी वूमनस अंडर १९ टी-२० विश्वचषक जिंकला. पहिल्यांदाच खेळवली गेलेली ही स्पर्धा १४ ते २९ जानेवारी दरम्यान १६ संघांमध्ये खेळली गेली. भारताच्या महिला अंडर १९ संघाचे नेतृत्व शफाली वर्मा हिच्याकडे होते, जी भारताच्या वरिष्ठ महिला संघाचासुद्धा भाग आहे. तिच्या अनुभवाच्या जोरावर तिने आघाडीचे नेतृत्व करत भारतीय महिलांना प्रथमच आयसीसी चॅम्पियनशिप मिळवून दिली. सुपर सिक्सच्या टप्प्यात ऑस्ट्रेलिया महिला अंडर १९ कडून झालेला पराभव सोडल्यास, भारतीय महिला अंडर १९ ने त्यांचे सर्व सामने जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत इंग्लंड महिला अंडर १९ संघाचा सात गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. भारताची श्वेता सेहरावत २९७ धावांसह या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली तर पार्शवी चोप्रा ११ विकेट्ससह सर्वात यशस्वी गोलानदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाज होती.
आखेरकर, डब्ल्यूपीएल (WPL) चा जन्म झाला
बहुप्रतिक्षित वूमन्स प्रीमियर लीग (WPL) चा जन्म अखेर २०२३ मध्ये झाला. ४ ते २६ मार्च दरम्यान खेळल्या गेलेल्या स्पर्धेत पाच संघ सहभागी झाले. एकूण २२ सामने मुंबई आणि नवी मुंबईमध्ये खेळले गेले. आयपीएल मधील सर्वात यशस्वी पुरुष संघाच्या महिला फ्रँचायझी, मुंबई इंडियन्सने, डब्ल्यूपीएल ची पहिली आवृत्ती जिंकली. या संघाचे नेतृत्व भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने केले. चाहत्यांनी दणदणीत संख्येने स्टेडियम भरले आणि डब्ल्यूपीएल चे मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आले. ज्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष पाहणे शक्य झाले नाही त्यांना त्यांच्या टेलिव्हिजन किंवा मोबाईल फोनवरून खेळाचा आनंद लुटला.
आशियाई गेम्स मध्ये जिंकले सुवर्ण पदक
२०१० आणि २०१४ मध्ये महिला क्रिकेट हा आशियाई गेम्सचा भाग असला तरी २०२३ मध्येच बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ चीनला पाठवण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला क्रिकेट संघाने निराश केले नाही कारण त्यांनी नऊ-सांघिक स्पर्धेमध्ये बहु-इच्छित सुवर्ण पदक मिळवले. २००४ पासून आशिया चषकात आपले वर्चस्व दाखवणारा भारत आशियाई गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार होता. आशियाई गेम्स स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव करून आशियाई खंडात आपण सर्वोत्कृस्ट आहोत हे दाखवून दिले.
भारताने मायदेशात प्रथमच इंग्लंडची “कसोटी” पास केली
जणू काही भारतीय महिला क्रिकेट संघ १४ डिसेंबरपासून ख्रिसमस साजरा करण्याच्या मूडमध्ये होता. इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका हरल्यानंतर, भारताने कसोटी सामन्यात बदला घेतला. चार दिवसीय कसोटी भारताने तीन दिवसात आटोपली. त्याने मायदेशात प्रथमच इंग्लंडला कसोटी सामन्यात पराभूत केले. भारताने भारतात खेळलेल्या महिला कसोटींपैकी या कसोटीत सर्वोच्च धावसंख्या उभारण्यापासून ते इंग्लंडला दोनदा बाद करण्यापर्यंत, बॅट आणि बॉल दोन्हीसह वर्चस्व गाजवले. त्या विजयानंतर महिला कसोटीत भारत इंग्लंडविरुद्ध ३-१ ने आघाडीवर आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून रचला इतिहास
३९ वर्षांनंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर महिला कसोटीचे आयोजन करण्यात आले होते. योगायोगाने, वानखेडे स्टेडियमवर १९८४ मध्ये खेळलेले तेच दोन संघ २०२३ मध्ये पुन्हा खेळले: भारत आणि ऑस्ट्रेलिया. इंग्लंडवर भारताच्या जोरदार विजयानंतर अवघ्या पाच दिवसांनी आत्मविश्वासाने भरलेला भारत पुन्हा एकदा कसोटी सामना खेळायला तयार होता. या वेळी त्यांच्या समोर ऑस्ट्रेलियाचे कठीण आव्हान होते. २१ ते २४ डिसेंबर दरम्यान हा कसोटी सामना खेळला गेला. याआधी खेळलेल्या १० कसोटींमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला कधीही पराभूत केले नसले तरी, यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघाकडून अपेक्षा जास्त होती. भारताने सर्व विभागांमध्ये ऑस्ट्रेलियाला मागे टाकत प्रथमच त्यांना पराभूत केले. इंग्लंडप्रमाणेच, त्यांनी ऑस्ट्रेलियाला दोनदा बाद केले. भारतीय फिरकी गोलंदाजांनी ही ऐतिहासिक कहाणी विणली. फलंदाजांनी उत्कृस्ट प्रदर्शन केले आणि गोलंदाजांना बचाव करण्यासाठी पुरेश्या धावा दिल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि त्यांचे चाहते हीच अपेक्षा करतील कि २०२३ प्रमाणेच २०२४ सुद्धा त्यांच्यासाठी यादगार असावे. २०२३ मध्ये जशी अंडर १९ महिला संघानी भारताला त्यांची पहिली आयसीसी चॅम्पिअनशिप मिळवून दिली काय तशी २०२४ मध्ये वरिष्ठ संघ मिळवेल? बांगलादेशमध्ये होणाऱ्या २०२४ आयसीसी वूमन्स टी-२० विश्वचषकावर सगळ्यांची नजर असेल.