महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
ठाणे: ठाणे शहरातील ३३ प्रभागांसाठी १९४२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून या केंद्रांतून १६ लाख ४९,८६७ मतदार मतदान करणार आहेत. महापालिकेची मुदत संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीसाठी महापालिका सज्ज झाली असून आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत पूर्व तयारीचा आढावा घेतला.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ३३ प्रभाग असून एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४९,८६७ इतकी आहे. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या आठ लाख ६३,८७८ तर महिला मतदारांची संख्या सात लाख ८५,८३० असून इतर मतदारांची संख्या १५९ इतकी आहे. ३३ प्रभागांत एकूण १९४२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. तर प्रत्यक्ष निवडणूकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मिळून एकूण ९७१० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त 20 टक्के राखीव कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.
या बैठकीत सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्व तयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्र निश्चिती व तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निश्चिती व तयारी, वाहन उपलब्धतता व सनियंत्रण, सी.सी.टिव्ही व वेबकास्टिंग सुविधा, विद्युत व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यवस्था, मतदान केंद्रांचे नियोजन, कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था, तसेच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये, मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रे, सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रुम) मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आदी ठिकाणी सी.सी.टिव्ही सुविधा तसेच अतिसंवेदनशील मतदान केंद्र तसेच अति संवेदनशील भागातील निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये इत्यादी ठिकाणी आवश्यकतेनुसार वेब कास्टिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रही तळमजल्यावर तयार करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध कराव्यात अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, मधुकर बोडके, मिताली संचेती, सचिन सांगळे, दिपक झिंजाड, अनघा कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह सर्व उपनगर अभियंता यांच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.