कल्याण : मराठी विरुद्ध हिंदी बोलण्याच्या वादातून एका १९ वर्षीय कॉलेज विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना कल्याण पूर्वेत समोर आली आहे. अर्णव खैरे (१९) असे या मुलाचे नाव आहे. या मुलाला लोकल ट्रेनमध्ये “तू मराठी बोलत नाहीस का? मराठी बोलण्याची लाज वाटते का?” असे म्हणत ४–५ जणांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. या मारहाणीमुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातूनच अर्णवने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचा संशय त्यांनी पोलिसांसमोर नोंदवला आहे.
कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावरील सहजीवन गृह निर्माण वसाहतीत अर्णव खैर रहात होता. ही घटना १८ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली असून, कोळसेवाडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा ‘मराठी–हिंदी’ वादाचे विषारी राजकारण, भाषिक भेदभाव आणि त्याचा तरुणांच्या मनावर होणारा परिणाम यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
अर्णव हा मुलुंड येथील केळकर कॉलेजचा प्रथम वर्षाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.