ठाणे : महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी आतापर्यंत १०२ महिलांना घरघंटी तर ८१ महिलांना शिलाई मशीनकरीता ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शंभर टक्के अनुदान देण्यात आले आहे.अनुदानासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या मुलींना शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता येण्यासाठी त्यांना मोफत सायकलीचे वाटप केले जाते. त्यामुळे बहुतांश मुली शहरात शिक्षणासाठी सायकलने ये-जा करतात. त्यांना ठाणे समाज कल्याण विभागातर्फे सायकलसाठी अनुदान देण्यात येते. महिलांना कपडे शिवण्याच्या कामासाठी 100टक्के अनुदानावर शिवण यंत्रे दिली जात असल्यामुळे महिलांना स्वयंरोजगार मिळाला आहे. एकूण 81 महिलांना मोफत शिवण यंत्रे मिळाल्याने स्वयंरोजगार मिळाला आहे. या मोफत शिवण यंत्रांसह घरघंटीचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये असावे किंवा दारिद्र्यरेषेचे कार्ड असलेल्या परिवारातील महिलांना यासाठी अनुदानाचा लाभ मिळवता येईल, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनी दिली.
घरघंटीकरीता शंभर टक्के अनुदान दिले जात असल्याने गावखेड्यातील महिलांना मिरची मसाला काढण्याच्या कामासह गहू, ज्वारी, बाजरी दळण्याचा स्वतंत्र रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यातील 102 महिलांना मिळालेल्या घरघंटीद्वारे रोजगार मिळाला आहे.