बनावट व्हिजा आणि विमान तिकीट देऊन १५ जणांची फसवणूक

भिवंडी : परदेशात कामासाठी पाठवितो असे सांगून १५ जणांकडून पैसे घेत त्यांना बनावट व्हिजा आणि विमान तिकीट देऊन फसविणाऱ्या चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद फुर्रकान अली फारुकी अली अन्सारी, डॉ. फैजान फारुकी अली अन्सारी, फारुकी अली अन्सारी आणि इमराना खातून मोहम्मद फुर्रकान अन्सारी अशी चार आरोपींची नावे असून ते बागेफिर्दोस पंजाबी हॉटेलसमोर राहत आहेत. त्यांनी चार महिन्यांपूर्वी तुम्हाला कामासाठी परदेशात मलेशिया आणि दुबई येथे पाठवितो असे सांगून १५ जणांकडून आठ लाख ३० हजार रुपये घेतले. आणि त्यांना बनावट व्हिजा आणि मुंबई ते मलेशिया आणि मुंबई ते दुबई असे बनावट एअर इंडियाचे तिकीट बनवून दिले. तसेच त्यांना मुंबई विमानतळावर पाठविले. तेथे गेल्यानंतर आरोपींनी तुमचे तिकीट रद्द झाल्याचे सांगत त्यांना कोलकत्ता ते मलेशिया असे एअर एशिया कंपनीच्या विमानाचे तिकीट देऊन कोलकत्ता विमानतळावर पाठविले. तेथे पोहोचल्यानंतर पुन्हा आरोपींना तिकीट रद्द झाल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादीसह १५ जण भिवंडीस परतले आणि आरोपींनी बनावट तिकीट देऊन वारंवार फसवणूक केल्याचा आरोप करीत शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घुगे करीत आहे.