फेरीवाले हटवण्यासाठी १५ दिवस; अन्यथा सोळावा दिवस मनसेचा

अंबरनाथ नगरपालिकेला दिला इशारा

अंबरनाथ: येत्या १५ दिवसांत अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाल्यांपासून मुक्त करावा अन्यथा १६ वा दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल. कायदा हाती घेऊन फेरीवाल्यांपासून स्टेशन परिसर मुक्त करून दाखवेल, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिला.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार (२५) मे रोजी नगरपालिका कार्यालयावर मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. श्री. जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी समस्या, लाच घेताना पालिकेचे अधिकारी सापडल्याच्या घटना वाढत असल्याने त्याला आळा घालावा, बेकायदा बांधकामांना पायबंद घालावा आदी समस्यांवर यावेळी चर्चा झाली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर फेरीवाले बसू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. मनसेच्या वतीने यासाठी लढा देण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील काही रेल्वे स्टेशन परिसरात त्याची अमलबजावणी झाली मग अंबरनाथ रेल्वे स्थानकात का होऊ शकली नाही, असा जाब जिल्हाध्यक्ष जाधव यांनी विचारला.

याबाबत चार दिवसांची मुदत मनसेच्या वतीने मागण्यात आली मात्र नियोजन करण्यास वेळ द्यावा असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्यानंतर पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली. कारवाई करताना मनसे पदाधिकाऱ्यांना अटक केली तरी अंबरनाथबाहेरील पदाधिकारी मागवून आंदोलन केले जाईल, असेही जिल्हाध्यक्ष जाधव यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना सांगितले.

जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखाली वडवली विभागातून मोर्चा निघाला. जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, संघटक संदीप लकडे, स्वप्नील बागुल, अविनाश सुरसे, धनंजय गुरव, माजी नगरसेविका अपर्णा भोईर, सुप्रिया देसाई, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध समस्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडल्या.