कल्याण : विस्थापित झालेल्या बाधितांचे पूनर्वसन करण्यासाठी बांधलेल्या इमारतीतील सदनिका दुरावस्थेत पडलेल्या असताना कचोरे येथील सदनिका दुरुस्तीवर किमान १५ कोटी रुपये खर्च करावा लागणार असल्याची माहिती बीएसयुपी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली आहे.
महानगरपालिकेने स्वतः केंद्र व राज्य शासनाच्या भाग भांडवलातून बीएसयुपी योजनेअंतर्गत कचोरे, उंबर्डे, इंदिरानगर तसेच डोंबिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर आणि दत्तनगर या ठिकाणी करोडो रुपये खर्च करीत शहरी गरीब तसेच विस्थापितांसाठी पुनर्वसन करण्यासाठी इमारती उभ्या केल्या होत्या. बीएसयुपी योजनेअंतर्गत पालिकेने 7272 सदनिका बांधल्या आहेत. यामध्ये 3136 पूर्ण राहण्यायोग्य घरे तयार करण्यात आली होती. 1271 बाधितांना यापूर्वीच ती वाटप करण्यात आली आहेत. 1865 सदनिका पडीक अवस्थेत असल्याने या सदनिका राहण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे.
बाधितांना योग्यवेळी त्या सदनिका वाटप करण्यात न आल्याने कडी कोयंड्यापासून दरवाजे-खिडक्या लंपास करण्यात आल्या आहेत. गेल्या 12 ते 13 वर्षांपासून पूर्ण तयार झालेल्या इमारतीतील सदनिका दुरावस्थेत वापराविना पडून राहिल्याने त्या राहण्यायोग्य नसल्याचे विदारक चित्र स्पष्ट झाले आहे.
या इमारतीतील सदनिकांना डागडुजी करण्यासाठी करोडो रुपये खर्च करावा लागणार असून हा खर्च नेमका कोण उचलणार असा प्रश्न या निमित्ताने येथे उपस्थित केला गेला आहे.
सात मजल्याच्या इमारती वापराविना पडून राहिल्याने त्यावर मलमपट्टी करण्यासाठी या प्रकल्पावर 15 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती बीएसयुपी योजनेच्या प्रकल्प अधिकारी तथा कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यातील कचोरे येथील दुरावस्थेत झालेल्या इमारतींवर सुमारे 15 कोटीचा निधी स्थापत्य, इलेक्ट्रिक कामासाठी मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो लवकरच राज्य शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान बाधित विस्थापितांचे पुनर्वसन पुन्हा काही काळ लांबणीवर पडणार असल्याचे या अनुषंगाने बोलले जात आहे.