१६ दिवसांत १५ कोटींची पाणीपट्टी वसूल

ठामपाकडून थकबाकीदारांच्या २०२ नळजोडण्या खंडित

ठाणे : ठाणे महानगरपालिकेकडून पाणीपट्टीच्या थकीत रकमेवरील व्याज, दंड, प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सुट सवलत देणे सुरू असून पाणीपट्टीवरील थकबाकी वसुली मोहिम तीव्र करण्यात आली आहे. 1 ते 16 मार्च 2026 या 16 दिवसांत पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण 14 कोटी 88 लाख 2133 रुपये इतकी वसुली करण्यात आली आहे.

थकीत पाणीपट्टीवर देण्यात आलेली सवलत 31 मार्च 2026 पर्यंत सुरू असून जे नागरिक आपली पाणीपट्टी भरणार नाहीत अशा थकबाकीदारांवर 1 एप्रिल 2026 पासून कारवाईची मोहिम अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

या कारवाईत दिवा येथे 202 नळसंयोजने खंडीत करण्यात आली, 28 पंप जप्त तर 14 पंप रुम सील करण्यात आले असून 75 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभाग समितीत 155 नळसंयोजने खंडीत करण्यात आली. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती 63 नळसंयोजने खंडीत करुन एकूण 438 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत 82 नळसंयोजने खंडीत करुन 141 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उथळसर प्रभाग समिती हद्दीत 19 नळसंयोजने खंडीत करण्यात आली. वर्तकनगर प्रभागसमितीत 12 नळसंयोजने खंडीत करुन 63 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण 533 नळसंयोजन खंडीत करण्यात आली. तर 28 पंप जप्त, 14 पंप रुम सील करण्यात आले असून एकूण 717 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

प्रभाग समितीनिहाय वसुली

माजिवडा-मानपाडा: चार कोटी 36 लाख 64, 861, नौपाडा-कोपरी: एक कोटी 69 लाख 53,636, कळवा: एक कोटी 74 लाख 68,740, वर्तकनगर: एक कोटी 69 लाख 95,630, उथळसर: एक कोटी, 52 लाख 64,173, दिवा: एक कोटी 20 लाख 28,204, लोकमान्य-सावरकर: 94 लाख 18,960, मुंब्रा: 52 लाख 36,351, वागळे: 83 लाख 80,059, नागरी सुविधा केंद्र आणि इतर: 33 लाख 91,519