ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
भिवंडी : भिवंडी व शहापूर पंचायत समितीच्या नव्या प्रशस्त इमारतीसाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये देण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केली. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मागणीवरुन हा निधी मंजूर करण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपा ठाणे ग्रामीणच्या वतीने आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्ता संवाद बैठकीला उपस्थिती दर्शविली. त्यावेळी त्यांनी कपिल पाटील व पांडुरंग बरोरा यांच्या मागणीचा संदर्भ देऊन ग्रामविकास विभागाकडून दोन्ही पंचायत समितीच्या प्रशस्त इमारतीसाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
शहापूर पंचायत समितीला प्रशस्त जागा असूनही नवीन इमारत नाही. त्यामुळे नवीन इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी कपिल पाटील व पांडुरंग बरोरा यांनी केली होती. तर जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या भिवंडी पंचायत समितीलाही स्वतंत्र इमारतीची आवश्यकता असल्याकडे कपिल पाटील यांनी लक्ष वेधले होते.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी ३ धरणे शहापूर तालुक्यात आहेत. त्या पाण्यापोटी मुंबई महापालिकेकडून राज्य शासनाला सेस दिला जातो. तो राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेच्या खात्यात वळविला जात होता. मात्र, तो बंद करण्यात आला. तो पुन्हा सुरू करून शहापूर तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते या कामांसाठी वापरावा, अशी जोरदार मागणी कपिल पाटील व पांडुरंग बरोरा यांनी केली. त्याबाबतही मंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी सकारात्मकता दर्शविली.
दरम्यान, भाजपाच्या संवाद बैठकीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार कथोरे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर पातकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, राजन घोरपडे, महामंत्री संभाजी शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीत मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.