बदलापूर : बदलापूर मार्गावरील रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून उद्यापासून १५ डब्यांच्या उपनगरीय लोकल सेवा सुरू होत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे बदलापूरसह परिसरातील लाखो दैनंदिन प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी होणार आहे.
शहरातील वाढत्या प्रवासीसंख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने बदलापूर मार्गावर टप्प्याटप्प्याने १५ डब्यांच्या उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून या सेवांचा प्रारंभ होत असून, त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बदलापूर शहरातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले होते. तसेच, बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांची भेट घेऊन शहरातील रेल्वे सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली होती.
रेल्वे प्रशासनाने आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण केल्यानंतर बदलापूर मार्गावर १५ डब्यांच्या काही लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय अमलात आणला आहे. या निर्णयामुळे महिलांपासून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरी-व्यवसायासाठी दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. बदलापूरकर प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.