फिरत्या पथक शाळेतील 145 मुलांना मिळाला शाळेमध्ये प्रवेश

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फिरते पथक शाळेतील 145 मुला-मुलींना महापालिका व खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. या मुलांना शाळेचे साहित्य, गणवेश वितरणाचा कार्यक्रम आज आमदार निरंजन डावखरे व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत पार पडला.

रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हे पाऊल स्तुत्य असून यासंदर्भात धोरण करण्यासाठी अधिवेशनात पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार श्री. डावखरे यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या फिरते पथक शाळेतील मुलांसाठी एक पाऊल प्रगतीकडे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये झालेल्या या आगळावेगळ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. डावखरे व जिल्हाधिकारी श्री. शिनगारे उपस्थित होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, पोलीस निरीक्षक मनिष पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राणी बैसाणे, भरत पोखरकर, स्वाती रणधिर, स्वयंसेवी संस्थाचे स्वाती सिंग, विजय जाधव, रमेश थोरात, श्री.खान आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना गणवेश, शालेय साहित्याचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.

आमदार श्री. डावखरे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्याचे नियोजन करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आतापर्यंत येत होतो. मात्र, आजच्या कार्यक्रमामुळे देशाच्या भावी पिढीच्या नियोजनासाठी आल्याचा आनंद झाला आहे. उपेक्षित, रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाचा हा उपक्रम चांगला आहे. मात्र, ही मुले या प्रवाहात कायम टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. रस्त्यांवरील मुलांसाठी वेगळे धोरण ठरविण्यासाठी विधीमंडळात पाठपुरावा करण्यात येईल.

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, शाळाबाह्य मुलांना औपचारिक शिक्षणात समावून घेण्याचा हा प्रयत्न म्हणजे सामाजिक ऋण फेडण्याची संधी आहे. ठाणे जिल्ह्यात रस्त्यावर राहणारी सर्वाधिक मुले सापडणे ही अभिमानाची गोष्ट नाही. यापैकी आता 145 मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एक पाऊल पुढे हा पहिला टप्पा आहे. उर्वरित मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा. या मुलांना शाळेपर्यंत आणण्याचा महिला बालविकास विभागाचा हा प्रवास थक्क करणारा आहे. या मुलांना शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचविणे आवश्यक आहे. आज या मुलांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहता, ते पुढील आयुष्यात राष्ट्राला दिशा देणारे व्यक्तिमत्व होतील.

श्री. सुर्यवंशी यांनी या उपक्रमासाठी आवश्यक ते विधी सहाय्य देण्यात येईल, असे सांगितले. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी श्रीमती सिंग व श्री. जाधव तसेच श्रीमती दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी सूत्रसंचालन केले.