ठाणे : विविध सोसायट्या, लॉन्स, रिसॉर्ट आणि वैयक्तिक व्यक्तींना ठाणे उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) ६० जणांच्या परवान्यांमुळे विभागाला तब्बल १२ लाख ६४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. यासाठी फक्त एक दिवसाचा अधिकृत परवाना जारी केला होता. राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाकडून कमर्शियलकरिता २२ हजार रुपये आणि वैयक्तिक पार्टीसाठी ७७०० रुपयांचे शुल्क आकारले होते.
अवैध दारू विक्री आणि व्यवसायाला रोखण्यासाठी ठाणे उत्पादन शुल्क विभाग कायम सतर्क असतो. मात्र नववर्षाचे स्वागत करताना अनेक भागात अनधिकृत मद्याच्या पार्ट्या सर्रास होतात. परंतु, विभागाने वेळीच उपाययोजना केली होती. पार्ट्या झोडायच्या असल्यास यासाठी परवाना घेऊन मगच पार्टीचे आयोजन करण्याची सक्त सूचना दिली होती. त्यामुळे जिल्ह्यात एक दिवसाच्या ६० परवान्यातून विभागाला तब्बल १२ लाख ६४ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.
ठिकठिकाणी नववर्षानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनाच्या नावाखाली, अवैध दारू पार्ट्या रंगणार नाही याची खबरदारी एक्साईजनी अगोदरच घेतली होती. पार्ट्या करण्यासाठी एक दिवसाचा अधिकृत परवाना जारी केला होता. त्याकरीता स्वागताची जय्यत तयारी करण्यासाठी आठवडा किंवा पंधरा दिवस अगोदरपासून, तयारी केली असल्याची माहिती ‘एक्साईज’ला मिळाल्यानंतर विभाग आणखी सर्तक झाला.
या स्वागत सोहळ्यात अवैध मद्यपार्टी रंगणार नाही याबाबत विभागाने कडक धोरण अवलंबले होते. विभागाकडून एक दिवसाचा परवाना घेतल्याशिवाय सोसायट्या, लॉन, रिसॉर्ट व वैयक्तिक पार्टीचे अधिकृत नियोजन करावेच लागेल, असे आगाऊ सांगण्यात आले होते. त्यामुळे आयोजकांनी विभागाकडून एक दिवसाचा परवाना घेतला होता.