नवी मुंबईत १२ हिवताप दूषित रुग्ण

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका हद्दीत 1 जानेवारीपासून 19 जून पर्यंत 76026 रक्तनमुने घेण्यात आले असून त्यामध्ये 12 हिवताप दूषित रूग्ण आढळले आहेत. तसेच 152 संशयित डेंग्यू असून एन आय व्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे 55 रक्तजल पाठविण्यात आलेले आहे. यामध्ये दूषित डेंग्यू रूग्ण एकही नाही.

26 जून रोजी आयोजित या विशेष जनजागृती शिबीरांच्या 26 ठिकाणी एकूण 11456 नागरिकांनी भेट दिली असून त्याठिकाणी 749 रक्तनमुने घेण्यात आले आहेत. अशाप्रकारे 25 एप्रिल पासून 208 जाहीर शिबीरे आयोजित करण्यात आली असून त्याचा लाभ 78,885 नागरिकांनी घेतला असून 5356 रक्तनमुने घेण्यात आलेले आहेत.

पावसाळा कालावधी हिवताप-डेंग्यूसारखे रोग पसरविणाऱ्या डासांसाठी पोषक आहे. हिवताप-डेंग्यूसारखे रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे करुन घरांतर्गत व घराभोवताली असलेल्या स्वच्छ साचलेल्या पाण्यामधील डासउत्पत्ती स्थानांमध्ये होत असते. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करुन त्यांचा प्रतिबंधाकरिता सक्रीय सहभाग घेण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून 26 जून रोजी 26 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात जाहीर शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी, ठाणे स्वाती गरुडे व आरोग्य सहाय्यक, जिल्हा हिवताप कार्यालय ठाणे शंकर गडरी यांनी भेट दिली. या जाहीर शिबीरांच्या ठिकाणी असलेले अभिनव प्रदर्शन संच व आरोग्य शिक्षण देण्याची पध्दत बघून त्यांनी समाधान व्यक्त केले.