ठाण्यात १३१ जागांसाठी १,१२७ अर्ज

ठाणे: तिकीट मिळवण्यापासून शक्तिप्रदर्शनापर्यंत आलेले अडथळे आणि गोंधळाचा सामना करत ३३ प्रभागगांतील १३१ जागांसाठी तब्बल ११२७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

अखेरच्या दिवशी अपेक्षेनुसार अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड तर प्रशासनाची तारांबळ उडाली. अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबरला दुपारी ३ वाजता संपल्यानंतरही उमेदवार रांगेत होते. त्यामुळे त्यांना कार्यालयात थांबवून रात्री उशीरापर्यंत अर्ज स्विकारण्याचे काम सुरू होते. परिणामी दुसर्‍या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रशासनाकडून उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार ३३ प्रभागांच्या १३१ पदांसाठी ११२७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये माजिवडा-मानपाडा, लोकमान्यनगर, वर्तकनगरमध्ये सर्वाधिक तर नौपाडा, उथळसरमध्ये कमी अर्ज दाखल झाले आहेत.
आला.

महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक ७९ उमेदवार दिले आहेत. तर भाजपने ४० उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीच्या जागावाटपात अनेक माजी नगरसेवक आणि इच्छूकांचा पत्ता कट झाला आहे. त्यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म देऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठी खेळी केली आहे. सुमारे ७५ उमेदवार त्यांनी निवडणुकीत उतरवले आहेत. महाविकास आघाडीमध्ये सन्मानजनक जागा न मिळाल्याने स्वबळावर लढणार्‍या काँग्रेसने ९० उमेदवारांना एबी फॉर्म दिला होता. त्यापैकी ७५ उमेदवारांनी अर्ज भरला आहेत. शिवसेना ठाकरे गट ५५, मनसे २८, राष्ट्रवादीचे ४० उमेदवार आहेत. पक्षीय जागांची गोळाबेरीज केली असता ही संख्या ४०० च्या घरात पोहचते. मात्र अपक्ष, इतर पक्ष आणि एकाच उमेदवाराचे दोनहून अधिक अर्जांमुळे ही संख्या अकराशेच्या पुढे गेली आहे.

प्रभागनिहाय अर्जांची संख्या
माजिवडा-मानपाडा: १२५, वर्तकनगर: १३४, लोकमान्य-सावरकरनगर: १३९, वागळे इस्टेट: १०५, नौपाडा: ९२, उथळसर: ९०, कळवा: १४२, मुंब्रा, (भाग १): ९१, मुंब्रा (भाग २): ७५, दिवा (भाग १): ६३, दिवा (भाग २): ७२