मुंबई : विधानपरिषदेच्या ११ नवनिर्वाचित सदस्यांचा आज २८ जुलै रोजी शपथविधी पार पडला. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171 (3) (घ) नुसार महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या अकरा सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना 16 जुलै 2024 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. संविधानाच्या अनुच्छेद 188 अन्वये विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित ११ सदस्यांना आज 28 जुलै, 2024 रोजी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे शपथ दिली.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे, सदाशिव खोत, डॉ. परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ.प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर यांनी आज शपथ घेतली.
या शपथविधीस विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव 1 (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव 2 (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी वर्ग, सन्माननीय नवनिर्वाचित सदस्यांचे आप्त, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.