आश्रमशाळेच्या १०९ विद्यार्थ्यांना वर्षश्राद्धाचे जेवण बाधले

दोन विद्यार्थी अत्यवस्थ

शहापूर: तालुक्यातील भातसई येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळेतील १०९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून विद्यार्थ्यांना शहापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोन विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. १०४ विद्यार्थ्यांची प्रकृती सुस्थितीत आहे. यामध्ये मुलांची संख्या ४६ व मुलींची संख्या ६३ आहे.

शहापूर तालुक्यातील ३५० च्या आसपास पटसंख्या असलेल्या भातसई येथील संत गाडगे महाराज अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून या सर्व विद्यार्थ्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची अधिकृत माहिती असून शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. या विद्यार्थी व विद्यार्थिनींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत.

भातसई आश्रम शाळेच्या विभागातील वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त एका व्यक्तीने उदात्त हेतूने या विद्यार्थ्यांना पुलाव आणि गुलाबजाम असे जेवण दिले होते. मात्र जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ अशा समस्या जाणवू लागल्या. हे पाहून आश्रमशाळेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने आदिवासी पालक आणि आदिवासी संघटना अधिकच आक्रमक होऊन दोषी अधिकारी, कर्मचारी आणि बेजबाबदार प्रकल्प अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर, मनसे नेते संतोष शिंदे, मनसेचे सचिव हॅरी खंडवी, विनायक सापळे, दशरथ भालके, भास्कर जाधव, अशोक इरनक, पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे, शहापूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि शहापूर पोलीस प्रशासनाने सदर परिस्थितीवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. मात्र यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मनसेकडून प्रखर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला आहे.

ही घटना दुर्दैवी असून याची सखोल चौकशी होणे अपेक्षित असल्याची भूमिका माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी यावेळी मांडली. या घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित हे रुग्णालयातील विद्यार्थ्यांची भेट घेण्यास निघाले असल्याचे संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके यांनी सांगितले.