भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका स्थापन झाल्यापासून प्रथमच 31 जुलै 2023 रोजी पर्यंत मीरा-भाईंदर महापालिकेने मालमत्ता कर रू.100 कोटीचा टप्पा पार पाडला आहे.
संगणक विभागामार्फत अद्यावत करण्यात आलेल्या वेबसाईट व MyMBMC मोबाईल ॲपचा वापर मालमत्ता कर भरणा करण्यासाठी नागरिकांनी विशेष पसंती दिली आहे. ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत 76,351 नागरिकांनी एकूण 40 कोटी 43 लाख 04 हजार 628 इतका कर भरणा केला आहे. तर 1,12,772 नागरिकांनी रोख रक्कम, चेक व डिमांड ड्राफ्टद्वारे एकूण 61 कोटी 73 लाख इतका मालमत्ता कर भरणा केलेला आहे. यामध्ये एकूण 01 लाख 89 हजार 123 मालमत्ता धारकांनी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य केले आहे.
आतापर्यंत एकूण 102 कोटी 16 लाख इतकी मालमत्ता कर वसुली करण्यात आली आहे. मालमत्ता कर भरणा केलेल्या सर्व नागरिकांचे महापालिकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी 31 जुलै रोजी पर्यंत 75 कोटी इतकी कर वसुली करण्यात आली होती. जून महिन्यात पाच टक्के सवलत योजनेचा एक लाख 37 हजार 722 नागरिकांनी तर जुलै महिन्यात तीन टक्के सवलत योजनेचा 51 हजार 846 नागरिकांनी लाभ घेतला असल्याने जुलै 31 पर्यंत रू. 100 कोटीचा टप्पा पार पडला आहे.
ज्या मालमत्ता धारकांनी सवलत योजनेचा लाभ न घेता मालमत्ता कराचा भरणा अद्याप केला नाही आहे त्या मालमत्ता धारकांना माहे एप्रिल, मे, जून व जुलै असे प्रतीमहिना दोन टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येणार आहे. ऑगस्ट 2023 पासून प्रतीमहीना दोन टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येणार असल्याची नोंद नागरिकांनी घेण्याचे आवाहन मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी ऑनलाईन सुविधा MyMBMC ॲप किंवा pg.mbmc.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन मालमत्ता कराचा भरणा करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.