ठाणे: ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील ग्रीन रोड येथे आज भरदिवसा एका माथेफिरूने १० ते १२ वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत तीन वाहन चालकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या.
ग्रीन रोड भागात सकाळी १०च्या सुमारास एक इसम हातात बांबू घेऊन या रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांच्या काचांवर प्रहार करत सुटला होता. त्याच्या या कृत्यामुळे काही काळ या भागातील वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नंतर काही नागरिकांनी आणि वाहन चालकांनी त्याला पकडून चोप दिला.
नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मुंबई, अंधेरीतील नफिज कामरुद्दीन शेख (३४) यांनी दिलेल्या तक्रारीत, सुनील वानखेडे (रा. जळगाव) या माथेफिरूने कालिका मंदिराजवळ त्यांच्या चारचाकी गाडीवर लाकडी बांबूने हल्ला करत पुढील व मागील काच फोडली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका ऑटो रिक्षा व दुसऱ्या कारचीही काच फोडली. या
घटनेनंतर त्या संतप्त वाहनचालकांनी संबंधित माथेफिरूस पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पुन्हा पोलिसांच्या हवाली केले. चौकशीत संबंधित व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त असून उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२४(४) अंतर्गत नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.