एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होणार १० डबल डेकर बस

नवी मुंबई : आजवर मुंबईतील रस्त्यावर धवणारी डबल डेकर बस आता नवी मुंबईतील रस्त्यावर देखील धावताना दिसणार आहे. मार्च अखेर एनएमएमटीच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यातील १० विद्युत डबल डेकर बस दाखल होणार आहेत.

दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोलचे वाढते दर यामुळे नवी मुंबई परिवहन तोट्यात आहे. शिवाय द्रव इंधनावर होणारा खर्च व धुरामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम पाहता केंद्र सरकारने सीएनजी आणि विद्युत वाहने चालवण्यावर अधिक भर दिला आहे.  केंद्र शासनाच्या फेम १ आणि फेम २ योजनेअंतर्गत नवी मुंबई परिवहनाच्या ताफ्यात १८० बस आहेत. मुबंईत सुरुवातीपासूनच डिझेल वर  चालणाऱ्या डबल डेकर बस आहेत. आता बेस्टच्या ताफ्यातदेखील विद्युत डबल डेकर बस दाखल झाली असून, प्रवाशांकरिता सुरू करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता मार्चअखेर नवी मुंबई महानगर पालिका परिवहन( एनएमएमटीच्या) ताफ्यात १० डबल डेकर बस दाखल होणार आहेत. २५-३५ डबल डेकर विद्युत बस घेण्याचे नियोजन परिवहनचे असून पहिल्या टप्यात १० विद्युत डबल डेकर बस घेण्यात येणार असून त्या मार्चअखेर नवी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती एनएमएमटीचे मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.