पहिल्याच तिमाहीत नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीत ४३४ कोटी

मालमत्ता करदाते झाले हायटेक

नवी मुंबई : आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीत तब्बल ४३४.०२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला असून, नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासातील ही एक विक्रमी आणि अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

या विक्रमी वसुलीमागे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासकीय कामकाज महत्त्वपूर्ण ठरले आहे. मागील वर्षी किंवा त्यापूर्वी मालमत्ता कर न भरलेल्या १५,२५० मालमत्ताधारकांकडून तब्बल २३.६७ कोटी रुपयांची वसूली करण्यात यश आले आहे. तसेच, मागील वर्षी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत कर भरणाऱ्या एक लाख २३,३२३ पैकी ५६,९७३ मालमत्ताधारकांनी यंदा पहिल्याच तिमाहीत कर भरण्यास प्राधान्य देऊन तब्बल १६५.७४ कोटींहून अधिक कराचा भरणा केला आहे.

मागील वर्षी पहिल्या तिमाहीत कर भरणाऱ्या करदात्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्याशी सातत्याने संवाद साधण्यात आला. परिणामी, सन २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत ९८,४७८ करदात्यांकडून जमा झालेल्या ३७२.४२ कोटी रुपयांच्या तुलनेत, यंदा एकंदरीत एक लाख ४३,३२९ करदात्यांकडून ४३४.०२ कोटींहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे.

यंदाच्या विक्रमी कर वसूलीत डिजिटल माध्यमांचा सर्वाधिक वाटा राहिला आहे. ५७,३९७ नागरिकांनी म्हणजेच एकूण कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांपैकी तब्बल ४०.६३ टक्के नागरिकांनी या एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवलेल्या पर्सनलाइज्ड पेमेंट लिंकद्वारे सुमारे ५८ कोटी रुपयांचा मालमत्ता कर घरबसल्या भरला आहे.

तीन लाख ५५,७७२ करदात्यांपैकी एक लाख ४३,३२९ करदात्यांकडून ४३४.०२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने एक लाख ३,४७३ करदात्यांनी म्हणजे ७२.२टक्के करदात्यांना २८०.७१ कोटी रुपयांचा कर भरला. ऑफलाईन पद्धतीने २७,०२३ करदात्यांनी म्हणजे १८.८५टक्के करदात्यांना ८.३६ कोटी रुपयांचा कर भरला. बँक व्यवहार माध्यमातून १२,८३३ करदात्यांकडून म्हणजे नऊ टक्के करदात्यांनी १४४.९३ कोटी रुपयांचा कर जमा केला. घणसोली विभागातून सर्वाधिक ८० कोटी रुपयांची कर वसुली झाली.

 

निवासी मालमत्तेतून ३१.९२टक्के कर, औद्योगिक मालमत्तेतून ३५.७९टक्के, व्यावसायिक मालमत्तेतून २२.२६टक्के आणि मिश्र व इतर मालमत्तेतून १०.०३टक्के कर संकलन करण्यात आले.