५७ हजार सेवानिवृत्ती धारकांचा१ २ कर्मचारी हाकतात गाडा

जिल्हा कोषागार कार्यालयातून महिन्याला वितरित होतो १६१ कोटींचा निधी

शहापूर: कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असतांना तब्बल ५७ हजार निवृत्ती वेतन धारकांना निर्धारित वेळेत पेन्शन मिळावी यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे येथील १ अधिकारी आणि १२ कर्मचारी आपली भूमिका चोखपणे बजावताना दिसत आहेत.

 

निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शन संदर्भात काही समस्या व अडचणी असतात. त्या सोडविण्याचे काम ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्राधान्याने करीत असतात. त्यामुळे ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याविषयी पेन्शनधारक समाधान व्यक्त करतांना दिसत आहेत. कोषागार कार्यालयाकडून महिन्याच्या एक तारखेला सर्व बँकांना पेन्शन वितरित केली जाते. मात्र बँकांच्या तांत्रिक अडचणीमुळे कधीकाळी पेन्शन धारकांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही. किंबहूना पेन्शन धारकांना कोणत्याही परिस्थितीत एक तारखेला पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे कोषागार कार्यालयाकडून सांगण्यात आले.

 

८० वर्षांवरील सेवानिवृत्तांना

अतिरिक्त वेतन ८० वर्षांवरील सेवानिवृत्तांना अतिरिक्त वेतन दिले जाते. ८० ते ८५ वयोगटातील निवृती वेतन धारकांच्या मूळ वेतनात २० टक्के वाढ केली जाते. ८५ ते ९० वयोगटातील नागरिकांच्या निवृत्ती वेतनात ३० टक्के, ९० ते ९५ वयोगटातील नागरिकांच्या वेतनात ४० टक्के, ९५ ते १०० वयोगटातील नागरिकांच्या वेतनात ५० टक्के, तर शंभरी पार नागरिकांच्या वेतनात शंभर टक्के वाढ केली जाते. त्यासाठी संबंधितांना कोणताही अर्ज करावा लागत नाही किंवा कोषगार कार्यालयात यावे लागत नाही अशी माहिती सहायक कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत यांनी दिली.

 

कर्मचारी संख्या अपुरी असताना या कार्यालयातील कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे आणि निर्धारित वेळेत काम करून निवृत्ती वेतन धारकांना सेवा पुरवीत असतात. कार्यालयात आलेल्या निवृत्ती वेतन धारकांना सन्मानाची वागणूक दिली जाते, असेही सुरेंद्र राऊत यांनी सांगितले.

 

जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतनासंबंधी कोणतेही काम घेऊन गेल्यास निवृत्त धारकांना चांगली वागणूक देऊन काम मार्गी लावले जाते. भ्रमणध्वनीवरून काही समस्या विचारल्यास त्याचे योग्य निराकरण केले जाते, असे शहापूर येथील निवृत्ती वेतनधारक पांडुरंग वेखंडे यांनी सांगितले.