नवी मुंबई: वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातून मोठ्या प्रमाणात हापूस निर्यात होतो. मात्र यंदा एप्रिल महिन्यात कोकणातील हापूसची आवक घटली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम निर्यातीवर झाला असून यंदा निर्यात १० टक्क्यांवर आली आहे. दरवर्षी सरासरी ७० टक्के ते ७५ टक्के निर्यात होती, यंदा मात्र अवघी १० टक्के निर्यात झाल्याने निर्यातदार हवालदिल झाले आहेत.
कोकणातील हापूसला परदेशात मोठी मागणी असते. मात्र यंदा हापुसचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरेसा हापुस दाखल होत नसल्याने त्याचा आखाती देशातील निर्यातीवर परिणाम होत आहे. आखाती देशात, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत या ठिकाणी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्याना अधिक प्रमाणात मागणी असते. १५ फेब्रुवारीनंतर टप्प्याटप्प्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथील हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा फेब्रुवारी अखेर अवकाळी पावसाच्या भीतीने वेळेआधीच आंबा बागयदार यांनी हापूसची तोडणी करून विक्रीसाठी बाजारात पाठवला. त्यामुळे यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये एकाच वेळी सर्व ठिकाणाहून हापूस मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाला होता, शिवाय दरही उतरले होते.
मार्चच्या सुरुवातीपासून दोन आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाने कोकणाला २-३ वेळा झोडपून काढले. त्यामुळे ऐन हापूसच्या हंगामात आंब्याच्या झाडावर अवेळी पालवी फुटली. पालवी फुटल्याने आंब्याचे शोषण झाले असून पुरेसे पोषण न मिळाल्याने आंबेगळ झाली. हेच आंबे एप्रिलमध्ये विक्रीसाठी दाखल होणार होते. अवकाळीने हाताशी आलेले उत्पादन वाया गेले.
एप्रिल ते मे अखेरपर्यंत निर्यातीवर जोर असतो. मात्र हापूसच्या मुख्य हंगामातच मुबलक हापूस उपलब्ध नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत आता निर्यात ही ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे मुबलक हापुस उपलब्ध होत नसल्याने यंदा ऐन हंगामात केवळ १० टक्के निर्यात होत आहे. तेच मागील वर्षी एप्रिलमध्ये ७० ते ७५ टक्के निर्यात झाली होती.ल, अशी माहिती हापूस निर्यातदारांनी दिली आहे.
कोकणात फेब्रुवारी मार्च महिन्यात वाढलेले तापमान आणि मार्चमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठी आंबागळ झाली. त्यामुळे एप्रिलमध्ये दाखल होणाऱ्या हापूस आंब्यावर त्याचा परिणाम झाल्याने हापूस उत्पादन घटले आहे. बाजारातील आवक घटल्याने निर्यातीसाठी आंबा उपलब्ध होत नसल्याने निर्यात कमी होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.