सोमैया आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत जवंजाळ विजेता

ठाणे: सोमैया कॅम्पस, विद्याविहार येथे ७ ते ८ मार्च २०२६ दरम्यान आयोजित के. जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. या स्पर्धेत ५५ हून अधिक महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत दादोजी कोंडदेव क्रीडांगण येथील खंडू रंगणेकर बॅडमिंटन हॉल येथे चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेवर आपले ठळक वर्चस्व प्रस्थापित केले.

पुरुष एकेरी गटात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी सर्व पदके जिंकत आपली ताकद दाखवून दिली. वेदांत जवंजाळ विजेता ठरला, तर श्वेतांक कर्णिक उपविजेता झाला. वैभव परदेशी आणि सानिध्य एकाडे यांनी कांस्यपदके पटकावली. उपांत्य फेरीत वेदांत जवंजाळने वैभव परदेशीवर २१-९, २१-१२ अशी सरळ सेटमध्ये मात करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीत श्वेतांक कर्णिकने सानिध्य एकाडेविरुद्ध अत्यंत चुरशीच्या लढतीत १६-२१, २१-१२, २१-१६ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात वेदांत जवंजाळने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत श्वेतांक कर्णिकवर २१-१६, २१-१२ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

महिला एकेरी गटात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अन्वी मोरे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात तिने जोरदार लढत दिली; मात्र जुही चौधरीकडून १७-२१, २१-१७, १४-२१ अशा चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.