नवी मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार रविवार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी नवी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
नेरूळ येथे कार्यकर्त्यांचा मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार नवी मुंबई शहरात येत असल्याने राष्ट्रवादी पक्षात उत्साह संचारला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यावर अनेकांनी अजित पवार यांची साथ दिली. मात्र माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, जी.एस.पाटील, राजू शिंदे, संदीप सुतार आदी मुख्य कार्यकर्त्यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर शहरात जिल्हाध्यक्ष पदावर चंद्रकांत पाटील यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली. त्यानंतर हा मेळावा जाहीर करून मेळाव्यात खुद्द शरद पवार यांची उपस्थिती राहणार असल्याने नवी मुंबई शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.
या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, मेहबूब शेख आदी मुख्य नेत्यांची हजेरी असणार आहे. या मेळाव्यात शरद पवार कोणावर प्रहार करतात याकडे लक्ष लागले आहे.