राष्ट्रवादीने प्रशासनाला दिले ऑक्सिजन सिलिंडर आणि झाड

ठामपा मुख्यालयावर ऑक्सिजन मोर्चा

ठाणे: ठाणे शहरातील पर्यावरणाच्या असमतोलाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गणेशवाडी ते ठामपा मुख्यालय असा ऑक्सिजन मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी हातात “टी.’यम’.सी.” असे फलक घेऊन वृक्षतोड करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेचा निषेध केला. यावेळी प्रशासनाला ऑक्सिजन सिलिंडर आणि झाड भेट म्हणून दिले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिकेवर अभिनव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात झाडे, ऑक्सिजन सिलिंडर घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चात यमाची वेशभूषा केलेला कार्यकर्ता सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

अंदमान, निकोबार, ताडोबा येथील झाडे कापली जात आहेत. उद्योगपतींना हजारो एकर जमीन देऊन तेथील झाडांची कत्तल केली जात आहे. ठाण्यात वनखात्याच्या 193 एकर जमिनीचा टीडीआर ठामपा देत आहे. ठाणेकरांनो वेळीच जागे व्हा अन्यथा आपल्या मुलाबाळांना श्वास घेता येणार नाही, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.

ठाणे शहरात गेल्या सहा महिन्यांत अधिकृत आणि बेकायदा पद्धतीने अंदाजे १० हजारहून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका आणि विविध सरकारी प्राधिकरणांनी पायाभूत सुविधांच्या नावाखाली हजारो झाडे तोडण्याचे प्रस्ताव मंजूर केले असून, अनेक ठिकाणी रात्रीच्या अंधारात बेकायदा वृक्षतोडही झाली आहे. मेट्रोसाठी ३०००, झाडे तोडली जाणार आहेत. उड्डाणपुलासाठी ३०० झाडे तोडली जाणार आहेत. शिळ – दिवा रस्त्यासाठी २८३ झाडे तोडली आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील पुनर्विकासासाठी एकूण १,६१४ झाडांपैकी ७२४ झाडे तोडण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी मागितली असून, यातील बरीच झाडे गेल्या काही महिन्यांत तोडली आहेत. नवीन महापालिका मुख्यालयाच्या बांधकामासाठी पोखरण रोड क्रमांक १ येथे ३२ मजली नव्या मुख्यालयाच्या बांधकामासाठी जवळपास २,६०० झाडे हटवण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी मंजूर झाला असून वृक्षतोड सुरू झाली आहे. परिणामी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळत आहे. याची पालिका प्रशासनाला जाण यावी, म्हणूनच हा मोर्चा काढला असल्याची माहिती मनोज प्रधान यांनी दिली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महिला कार्याध्यक्षा फुलबानो पटेल, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.