मीरा-भाईंदर महापालिकेची विक्रमी वसुली
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेकडून मालमत्ता कर देयकाचे ऑनलाईन पद्धतीने वितरण झालेले आहे. प्रथमच तिमाहीत ५० कोटींचा मालमत्ता कर नागरिकांनी भरला आहे. विशेष म्हणजे ४३ हजार नागरिकांनी ऑनलाईन भरणा केला आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी 30 जून 2023 पर्यंत आपल्या मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा केल्यास त्यांना पाच टक्के सूट मिळणार असल्याचे मीरा भाईंदर महानगरपालिका कर विभागामार्फत जाहीर करण्यात आले होते. नागरिकांनी या संधीचा लाभ घेतल्याने इतिहासात प्रथमच तिमाहीत 24 जून 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत महानगरपालिकेच्या तिजोरीत 50 कोटी इतका मालमत्ता कर जमा केला आहे. इतिहासात प्रथमच तिमाहीत 50 कोटी मालमत्ता कर वसुली झाल्याने आयुक्त दिलीप ढोले यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, सिस्टम मॅनेजर राज घरत, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत 43 हजार नागरिकांनी 22 कोटी तर 59 हजार नागरिकांनी 28 कोटी इतका कर भरणा केला आहे.
अद्याप मालमत्ता कर भरणा न केलेल्या नागरिकांनी ऑनलाईन सुविधा MyMBMC ॲप किंवा www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन 30 जून 2023 पर्यंत कर भरणा करून पाच टक्के सूट या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.