ठाणे, मुंबईतील 20 लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडून

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बेमुदत संप सुरू

ठाणे : महाराष्ट्रातील सरकारी -निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांनी जुनी पेन्शन योजना व अन्य मागण्यांसाठी आज, मंगळवारपासून सुरू केलेल्या बेमुदत संपात राज्यातील जवळपास ८० टक्के कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभाग घेतला. राज्यातील सुमारे ५० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे ठाणे आणि मुंबईतील 18 ते 20 लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम ठप्प झाले.

त्यामुळे एकूण किमान ८५ लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे काम शिल्लक राहिले आहे. उर्वरित शिक्षकही लवकरच या संपात सहभागी होतील. जुनी पेन्शन योजना मान्य केल्याशिवाय हा संप मागे घेतला जाणार नाही, असे ‘महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघा’चे समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर यांनी ‘ठाणेवैभव’ला ठामपणे सांगितले.

दरम्यान, आज बारावीची परीक्षा सुरळीत पार पडली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागू नये, यासाठी विद्यार्थी हितास्तव आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी साहेब यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षक महासंघाने घेतला.

त्यानुसार मंगळवारी परीक्षा घेण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले आहे. परंतु उत्तरपत्रिका तपासणीचे कार्य बंद केले आहे. इ. अकरावीचे अध्यापन, मूल्यमापन आणि महाविद्यालयीन इतर सर्व कामे बंद केली आहेत. राज्य शासनाने लवकरातलवकर जुन्या पेन्शन योजनेची मागणी मान्य करावी व कर्मचारी यांचा असंतोष दूर करावा, या मागणीवर महासंघ आणि शिक्षकवृंद ठाम आहेत.