जितो फाऊंडेशनच्या देणगीमुळे पालकांना दिलासा
ठाणे: अवघ्या ११ महिन्यांच्या बालकावर पेसमेकर बसविण्याची अवघड शस्त्रक्रिया नुकतीच ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप जे. आशर कार्डियाक सेंटर येथे करण्यात आली. साडेतीन तासाच्या या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ते बालक आता रुग्णालयातून घरी परतले आहे.
अशा स्वरुपाच्या, ११ महिने ते २.५ वर्षांच्या १० बालकांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये जितो फाऊंडेशनने दिलेल्या देणगीमुळे ५० टक्के सवलतीच्या दरात करण्यात आल्या असून त्या सगळ्या बालकांना घरी सोडण्यात आले आहे.
अकरा महिन्यांच्या बालकावर तातडीची ओपन पर्मनंट पेसमेकर इन्सर्शन शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसऱ्या एका हॉस्पिटलकडून महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आली. त्यावर २४ तासांच्या निधीची जुळवाजुळव करून, पेसमेकर उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर साडेतीन तासांची ही शस्त्रक्रिया डॉ. एम. एस. निबांळकर, डॉ. सारंग गायकवाड, डॉ. शैलेश यांच्या नेत्तृत्वाखाली यशस्वीपणे करण्यात आली. आता ते बालक स्वस्थ असून त्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसात महावीर जैन हॉस्पिटलमध्ये अशा स्वरुपाच्या आणखी नऊ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातील बालकांची वये ही ११ महिने, १४ महिने, दोन वर्षे, अडिच वर्षे अशी आहेत. त्यांची वजने ५ ते ३० किलो या दरम्यान आहेत. त्यांच्यावर, डबल डिव्हाईस क्लोजर, बलून फेरिफेरिअल वॉल्वोप्लास्टी, एएसडी डीव्हाईस क्लोजर, पीडीए डीव्हाईस क्लोजर, बलून एओरिटिक वॉल्वोप्लास्टी, कार्डियॅक कॅथ आणि ओपन पर्मनंट पेसमेकर इन्सर्शन या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
महावीर जैन हॉस्पिटलमध्ये सात खाटांचा बालकांचा अतिदक्षता विभाग आहे. एकूण १०० खाटांचे हे रुग्णालय असून त्यात प्रताप आशर कार्डियाक सेंटरचाही समावेश आहे. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय विश्वस्त महेंद्र जैन आणि अध्यक्ष दिपक भेडा यांच्या पाठिंब्यामुळे अशाप्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याची माहिती डॉ. लब्धी शाह यांनी दिली.