भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेने आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाने अनधिकृतपणे फटाका विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यवसायांवर कडक कारवाई केली.
संपुर्ण दिवसभर सुरु असलेल्या या कारवाईत अग्निशमन विभागाने अनधिकृतपणे फटाका विक्री व्यवसाय करणाऱ्या दुकानांतील फटाक्यांच्या मालावर अग्निशमन वाहनातील पाणी मारुन फटाके निकामी केले, तसेच काही ठिकाणी माल जप्त करण्यात आला व जप्त केलेला माल साठवुन न ठेवता तो माल जमिनीत पुरण्याची कारवाई करण्यात आली.
अग्निशमन विभागाने आज दिवसभरात एकुण 18 दुकानांवर कारवाई केली असून त्यापैकी सात दुकानांत पाणी मारुन फटाके भिजविण्यात आले, तर चार दुकानांतील माल जप्त करण्यात आला आणि सात दुकाने पुर्णत: बंद करण्यात आली. याचबरोबर अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला प्राप्त केलेली जी दुकाने नियमांचे उल्ल्ंघन करित आहेत अशा दुकानांना दिलेले नाहरकत दाखले रद्द करणेबाबत कारवाई हाती घेणार असल्याचे निर्देश आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले आहे.
अनधिकृत फटाका विक्री रोखणे करिता अग्निशमन विभागाचे दोन अग्निशमन केंद्र अधिकारी, चार सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी व इतर 25 कर्मचाऱ्यांसह एक वॉटर टेंडर, एक रेस्क्यु वाहन, दोन मिनी वॉटर टेंडर, दोन पिक अप इत्यादी वाहनांचा समावेश करित अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उप-आयुक्त सचिन बांगर यांनी प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेऊन शहरात अनधिकृत फटाका विक्रीस संपुर्णपणे आळा घालण्याच्या आयुक्त यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता कारवाई पार पाडली.