जिल्हा
विनापरवाना विद्यार्थी वाहतूक; पालकांचा जीव टांगणीला!
विनापरवाना विद्यार्थी वाहतूक; पालकांचा जीव टांगणीला!
फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात ४७ गाड्यांवर कारवाई
ठाणे: ठाणे शहरात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बेकायदेशीर खाजगी स्कूल व्हॅन चालकांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या सहा दिवसांत २०२ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये तब्बल ४७ वाहनांनी कोणताही वैध परवाना न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याचे उघडकीस आले आहे.
शालेय वाहनांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेसाठी प्रथमोपचार पेटी, जीपीएस यंत्रणा, अग्निशमन यंत्र, योग्य आसनव्यवस्था, अधिकृत चालक-वाहक आणि फिटनेस प्रमाणपत्र यासारख्या बाबी अनिवार्य असतानाही ही वाहने नियम धाब्यावर बसवत आहेत. काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. कागदपत्रांची पूर्तता, विमा, कर, फिटनेस यांचा अभाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
नुकत्याच काही दुर्घटनांमुळे खाजगी व्हॅनमधून होणारा विद्यार्थ्यांचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो, हे पटवून देणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेली ही कारवाई अधिक गतीने आणि काटेकोरपणे राबवली जात आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट, कोपरी, घोडबंदर, माजिवडा आणि कळवा परिसरात विशेष पथकाने सकाळच्या वेळात तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे. कारवाईनंतर अनेक व्हॅन चालक आणि खाजगी स्कूल बस व्हॅन चालकांचे धाबे दणाणले आहेत.
"विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बेकायदेशीरपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जात आहे आणि ही मोहीम पुढेही सुरु राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले.
एकाच व्हॅनमध्ये १५-१८ मुले कोंबली जातात. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचे वय, पार्श्वभूमी, परवाना... काहीच माहित नाही. पण शाळा वेळेवर गाठायची म्हणून अशा वाहनांचा पर्याय स्वीकारतो, असे एका पालकाने सांगितले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475