जिल्हा
ठाण्यात २४ तासांत दोन खून आणि गोळीबार
ठाण्यात २४ तासांत दोन खून आणि गोळीबार
फोटो: ठाणे वैभव
कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
ठाणे : ठाणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली असून २४ तासांत दोन खून आणि एका तरुणावर गोळीबार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय चोरी, खुनाचे प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांनी देखील ठाणेकर भयभीत झाले आहेत.
नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तलावपाळी भागात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भररस्त्यात झालेल्या या गुन्ह्याने पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला नसल्याची चर्चा ठाण्यात सुरु झाली आहे.
वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डीएव्ही शाळेच्या समोर क्षुल्लक कारणावरून १९ वर्षांच्या मुलाचा खून करण्यात आला. चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान उल्हासनगर येथे एका तरुणावर गोळीबार करण्यात आला असून गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
चार दिवसांपूर्वी वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्रीनगर भागात नायर नावाच्या मुलाचा १५ जणांच्या टोळक्यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.
ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून शहराच्या विविध भागांत अमली पदार्थांची सर्रास विक्री सुरु आहे. पोलिस विभाग ठाण्यात अस्तित्वात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागिल अनेक वर्षे ठाण्यात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर काही दिवसांतच हे सर्व पोलिस अधिकारी पुन्हा त्याच विभागात आल्याने गुन्हेगारांना त्यांचा धाक राहिला नसल्याची चर्चा ठाणे शहरात सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहविभाग असल्याने त्यांनी ठाण्याच्या गुन्हेगारीवर अंकुश आणावा, अशी मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475