जिल्हा

'टकटक टोळी'चे दोघे जेरबंद; सहा चोरीचे मोबाईल हस्तगत

'टकटक टोळी'चे दोघे जेरबंद; सहा चोरीचे मोबाईल हस्तगत
'टकटक टोळी'चे दोघे जेरबंद; सहा चोरीचे मोबाईल हस्तगत फोटो: ठाणे वैभव
वाहतूक पोलिसांची पुन्हा धाडसी कारवाई ठाणे: कापुरबावडी वाहतुक शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा धाडसी कारवाई केली आहे. कार चालकांना लक्ष्य करून महागडे मोबाईल लंपास करणाऱ्या 'टकटक टोळी'च्या त्रिकुटापैकी दोघांच्या मुसक्या कापूरबावडी वाहतूक पोलिसांनी आवळल्या असून कारचालक लघुशंकेच्या बहाण्याने पळून गेला. साकेत कट येथे कारमधून धूम ठोकण्याआधीच पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल सहा मोबाईल हस्तगत केले. त्यापैकी एक मोबाईल तर काही वेळापूर्वीच चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कारमधून चोरल्याचे उघड झाले आहे. सोमवारी ८ जून रोजी सायंकाळी साकेत कट येथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई मनोहर ईशी यांना एका दुचाकीस्वाराने घोडबंदर रोडवर कारमधून मोबाईल चोरी करून चोरटे कारमधून (क्रमांक डीएल ८सी एए ३१९२) नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच ईशी यांनी हवालदार राजाराम जाधव आणि सुनील राठोड यांना मदतीसाठी बोलावून मुंबई-नाशिक मार्गावर ठाण मांडले. शोधमोहीम सुरू असताना काही वेळातच संशयित कार दिसताच पोलिसांनी तत्परतेने अडवून रस्त्याकडेला उभी केली. कारमध्ये चालकासह तीन संशयित व्यक्ती होत्या. कारची तपासणी केली असता डॅशबोर्डमध्ये सहा महागडे मोबाईल फोन आढळले. मोबाईल संदर्भात विचारणा केल्यावर संशयितांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे कापूरबावडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तपास पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तपास पथक येण्यापूर्वी संबंधित कारच्या चालकाने लघुशंकेचा बहाणा करीत धूम ठोकली. मात्र उर्वरित दोघा संशयितांना वाहतुक पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कापूरबावडी पोलिसांकडे सुपूर्द केले. फरार कार चालकाचा शोध सुरू आहे. यावेळी कासारवडवली आणि चितळसर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलपैकी आयफोन १७ प्रो हा मोबाईल चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडबंदर रोडवरील मुल्ला बाग-हिल क्रिस्ट परिसरातून चोरीला गेल्याचे उघड झाले. हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणारे आशुतोष देवल हे कामावरून परतत असताना त्यांच्या वाहनाजवळ येऊन टकटक टोळीने सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला होता, अशी माहिती कापूरबावडी वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिली. दरम्यान, वाहतुक पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी कौतुक केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600