जिल्हा
कल्याण-डोंबिवलीत विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू
कल्याण-डोंबिवलीत विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
कल्याण-कल्याण-डोंबिवलीत दोन वेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा मृत्यू झाला. एका कामगाराचा मृत्यू कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव हद्दीतील एका बिर्याणी दुकानात झाला तर, दुसरी घटना कल्याण पश्चिमेतील आधारवाडी येथे घडली आहे.
अजयकुमार दसई गौतम (२०) असे एका मृत कामगाराचे नाव आहे. तो मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील बस्ती जिल्ह्यातील मल्लीपूर तालुक्यातील बाबुपुरा गावचा रहिवासी आहे.
अजयकुमार गौतम हा मुंबईत काही कामानिमित्त आला होता. डोंबिवलीजवळील शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव हद्दीतील ताज बिर्याणी दुकानात तो मागील एक महिन्यापासून काम करत होता. रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान बिर्याणी दुकानातील आवराआवर झाल्यानंतर अजयकुमारने भोजन केले. आणि तो हात धुऊन दुकानात उभ्या असलेल्या एका लोखंडी मंचकावर काही ठेवण्यास गेला. हात ओले असल्याने आणि त्या लोखंडी मंचकात वीज प्रवाह आल्याने अजयकुमारचे हात लोखंडी मंचकाला लागताच, अजयकुमार वेगाने दुकानात फेकला गेला. काही क्षणात तो बेशुध्द पडला. त्याला तातडीने इतर कामगारांनी, दुकान मालकाने डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात आणले. तेथे त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
दुसऱ्या एका घटनेत कल्याण पश्चिमेत आधारवाडी भागात संदीप रावत (३५) यांना पाणी खेचण्याच्या मोटारीत आलेल्या विजेचा धक्का बसून तो बेशुध्द पडला. त्याला कुटुंबीय, शेजाऱ्यांनी तत्काळ पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475