जिल्हा
वृक्ष प्राधिकरणाची आयुक्तांकडून 'झाडाझडती'
वृक्ष प्राधिकरणाची आयुक्तांकडून 'झाडाझडती'
फोटो: ठाणे वैभव
उद्यानांना मिळणार झळाळी
ठाणे : कोट्यावधी रुपये खर्चुुन नुतनीकरण केलेल्या उद्यानांची देखभालअभावी काही महिन्यातच दुरावस्था होत असल्याची बाब निदर्शनास आले. सुस्त अधिकाऱ्यांमुळे एक धोकादायक फांदी तोडण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनाच अखेर पुढाकार घ्यावा लागल्याच्या वृत्ताने प्राधिकरणाचे पितळही उघडे पडले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजित बांगर यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेऊन त्यांची कानउघाडणी केली.
शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरू असतानाच, दुसरीकडे मात्र उद्यानांकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्चुन उद्यानांची उभारणी करण्यात येते. नवनवीन संकल्पनेतून उद्याने तयार केली जात आहेत. ठाणेकरांना विरंगुळा आणि मनोरंजनाचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून उद्यानांची उभारणी केली जाते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेल्या पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नुतनीकरण केलेल्या उद्यानांची अवघ्या काही महिन्यातच दुरावस्था होताना दिसून येत आहे. कोट्यावधी रुपये खर्चुन उभारलेल्या उद्यानांचा नागरिकांना फायदा होत नसल्यामुळे पालिकेच्या कारभारावर टीका होत आहे. उद्यानांच्या उद्घाटनानंतर दोन ते तीन महिन्यातच देखभालअभावी त्याची दुरावस्था होत असल्याची बाब ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास आली असून याच मुद्द्यावरून त्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. शहरातील सर्वच उद्याने सुस्थितीत ठेवण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
राबोडी येथील धोकादायक फांदी तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाचे धावडे यांनी दाखवलेली अनास्था 'ठाणेवैभव' मध्ये झळकल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत स्वतः पुढाकार घेतला आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन ही फांदी छाटली. यामुळे पावसाळ्यात होणारी संभावित दुर्घटना टळली. याबाबत श्री. हेरवाडे यांचे परिसरातून कौतुक होत आहे. त्याचवेळी निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या जोरावर वृक्ष प्राधिकरण पावसाळ्यात सक्षमपणे जबाबदारी कशी पेलणार, असा प्रश्न आयुक्तांना विचारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर तरी वृक्ष प्राधिकरण जागे होईल, अशी अपेक्षा ठाणेकर व्यक्त करीत आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475