जिल्हा

आणखी महिनाभर टोमॅटो राहणार 'लालबुंद'

आणखी महिनाभर टोमॅटो राहणार  'लालबुंद'
आणखी महिनाभर टोमॅटो राहणार 'लालबुंद' फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: मागील एक ते दीड महिन्यांपासून टोमॅटोची आवक घटल्याने दराने उच्चांक गाठला आहे. वाशीतील एपीएमसी भाजी घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वधारत असून गुरूवारी उच्च प्रतिचा टोमॅटो प्रतिकिलो १३० रुपयांनी विक्री झाला आहे. बाजारात जोपर्यंत राज्यातील आवक वाढत नाही तोवर दर असेच असणार आहेत. त्यामुळे गृहिणींना आणखीन महिनाभर टोमॅटोची झळ बसणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. बाजारात सर्वच ठिकाणी किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वाढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत होता. दरम्यानच्या कालावधीत कित्येक टोमॅटो शेतकऱ्यांनी उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने रस्त्यावर टोमॅटो फेकले होते. तर काहींनी टोमॅटो लागवड केली नाही. त्यामुळे सध्या टोमॅटो उत्पादन घटले आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर वधारत आहेत. यंदा टोमॅटोच्या दराने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. आणखीन महिनाभर टोमॅटोचे दर चढेच राहतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी एपीएमसीत टोमॅटोच्या २५ तर गुरुवारी २३ गाड्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये ३० ते ४०टक्के बंगळुरू येथून टोमॅटो दाखल होत आहेत, तर उर्वरित टोमॅटो राज्यातील आहेत. पुढील महिन्यात राज्यातील टोमॅटो आवक वाढेल. मात्र तोपर्यंत टोमॅटोचे दर चढेच राहितील असे मत व्यक्त होत आहे. राज्यातील टोमॅटो आवक जरी वाढली तरी प्रतिकिलो टोमॅटो ५०-९० रुपयांवर असतील असे शक्यता वर्तविण्यात येत आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो टोमॅटो कमीत कमी १००रुपये तर जास्तीत जास्त १३० रुपये तर किरकोळ बाजारात १६० रुपयांपासून २०० रुपये दराने विक्री होत आहे. एपीएमसीत टोमॅटोची आवक कमी आहे, त्यामुळे दर वधारले आहेत. बाजारात सध्या बंगळुरू आणि राज्यातील टोमॅटोची आवक होत आहे. मात्र आणखीन महिनाभर टोमॅटोचे दर चढेच राहतील. महिन्याभराने राज्यातील टोमॅटोची आवक वाढेल, त्यावेळी टोमॅटोचे दर उतरण्याची शक्यता आहे. मात्र हे देखील सर्व पावसावर अवलंबून आहे, अशी माहिती व्यापारी कैलास ताजणे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475