जिल्हा
वर्षभरापूर्वी लोकार्पण झालेले तरण तलाव अद्याप बंदच
वर्षभरापूर्वी लोकार्पण झालेले तरण तलाव अद्याप बंदच
फोटो: ठाणे वैभव
२१ कोटींचा खर्च केल्यानंतर आणखी आठ कोटी खर्चाचा प्रस्ताव
ठाणे : बाळकूम येथील ऑलिम्पिक दर्जाच्या तरण तलावाचे लोकार्पण मागील वर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले होते. मात्र आजही हा तरण तलाव खुला होऊ शकलेला नाही. आधीच २१ कोटींचा खर्च करण्यात आला असताना आणखी आठ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत गडकरी रंगायतन आणि कळव्यात असे दोन तरण तलाव आहेत. याठिकाणी प्रवेश मिळणे दरवर्षी कठीण जात असते. त्यानुसार बाळकुम भागात ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव बांधण्यात आला आहे. आधीच या तरण तलावाचे काम लांबणीवर पडले होते. त्यानंतर मागील वर्षी ठाणे महपालिका निवडणुका लागतील. या दृष्टीने या तलावाचे लोकार्पण विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले होते. परंतु त्यानंतर आजतागायत हा तरण तलाव क्रिडा प्रेमींसाठी खुला झाला नसल्याची बाब समोर आली आहे.
या तरण तलावाचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानुसार आता त्यासाठी निविदा काढण्यात आली असून यासाठी आठ कोटींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. त्यामुळे यंदा देखील एप्रिल महिना संपत आला विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्या लागलेल्या आहेत. परंतु हा तरण तलाव काही क्रिडा प्रेमींना आणि विद्यार्थ्यांना देखील उपलब्ध होऊ शकणार नसल्याचेच दिसत आहे.
'काम अपूर्ण होते तर या तरण तलावाचे लोकार्पण कशासाठी केले? आधीच या तलावासाठी २१ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. आता पुन्हा आठ कोटींचा खर्च केला जाणार आहे. ठाणेकरांच्या खिशातूनच हा खर्च केला जाणार आहे. परंतु ही ठाणेकरांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी आहे. लवकरात लवकर हा तलाव ठाणेकरांसाठी खुला व्हावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
300x450
300x600